Published On : Thu, Mar 22nd, 2018

कामगिरी दाखवा अन्यथा कारवाई

Advertisement


नागपूर: सर्व झोनची कर थकबाकी ही मोठ्या प्रमाणावर आहे. ही थकबाकी वसूल करण्यात कर निरीक्षक व कर संग्राहक कामचुकारपणा करताना दिसत आहे. सर्व थकबाकी ही ३१ मार्चपर्यंत वसूल झालीच पाहिजे. ज्यांची कामगिरी दिसणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिला.

कर वसुली संदर्भातील गुरूवारी (ता.२२) सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनचा आढावा घेतला.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कर आकारणी व कर संकलन समिती सभापती संदीप जाधव, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम, सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे, प्रफुल्ल फरकासे,लकडगंज झोन येथील बैठकीला झोन सभापती दीपक वाडीभस्मे, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, मंगळवारी झोन येथे झालेल्या बैठकीत झोन सभापती सुषमा चौधरी, सहायक आयुक्त हरीश राऊत, आसीनगर येथे झालेल्या बैठकीत झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, चित्रा गोतमारे, मंगला लांजेवार,सहायक आयुक्त प्रकाश वराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, झोन सहायक अधीक्षक महेंद्र बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.


प्रारंभी झोनच्या करवसुली संदर्भातील अहवाल सहायक आयुक्तांमार्फत सभापतींनी मागितला. सतरंजीपुरा झोनमध्ये एकूण डिमांड १४ कोटी ६६ लाख आहे. त्यापैकी ९ कोटी ६१ लाख वसु झाले असल्याची माहिती झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी दिली.आतापावेतो केवळ इतकी वसुली झाल्याने सभापतींनी संताप व्यक्त केला. कारणे सांगू नका. नियोजन करा आणि ३१ मार्चपर्यंत शतप्रतिशत करवसुली करा, असे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले.

जे कर भरण्यात टाळाटाळ करीत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात यावा, असेही आदेश सभापतींनी दिले. ज्या कर संग्राहकांनी आतापर्यंत कमी कर वसुली केली, त्यांना सभापतींनी खडेबोल सुनावले. ज्या कर संग्राहकाची कामगिरी कमी आहे. त्यांचा दररोजचा वसुली अहवाल झोन सहायक आयुक्तांमार्फत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. चालू कराचे देयके नागरिकांपर्यंत २६ मार्चपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पोहचविण्यात यावे, अशी सूचना देखील केली.