नागपूर : शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यु-ट्यूब चँनलवरील व्हिडीओला लाईक्स’ आणि ‘फॉलो’ केल्यास महिन्याला लाखो रुपये कमविता असे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवकाची १० लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, न्यु नरसाळा येथील रहिवासी उल्हास लांडगे (३८) यांचा फेब्रीकेशनचा व्यवसाय असून ते यातून चांगलीच कमाई करतात. एक दिवस त्यांच्या व्हॉट्सअॅपवर मॅसेज आला. आमच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचे शोरूमचे व्हिडीओ आहेत. प्रत्येक लाईकला ५० रुपये मिळतील. तुम्हाला जेवढे लाईक्स मिळतील, तेवढी रक्कम तुमची वाढत जाईल. यावरून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.
सायबर गुन्हेगाराने त्यांना लिंक पाठविली. त्यानंतर काही वेळातच त्यांना त्यांच्या खात्यात ३५० रुपये जमा झाले. रक्कम मिळाल्यावर लांडगे यांचा विश्वास बसला. सायबर गुन्हेगाराने रक्कम पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. दरम्यान ‘तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला नफा मिळत जाईल असे त्या ठगांनी लांडगे यांना सांगितले. त्यावरही त्यांना नफा मिळाला. तीन लाख रुपये पाठविल्यास पाच लाख रुपये मिळतील, असे आमिष त्यांना दिला. त्यानंतर ठगांचा आकडा वाढत गेला. लांडगे यांनी हळूहळू दहा लाखांची रक्कम आरोपीच्या बँक खात्यात जमा केली. मात्र, यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा रक्कम मिळाली नाही. यावर त्यांची फसवणूक त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर गुन्हेगारांसंदर्भात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.