Published On : Thu, Aug 8th, 2019

१० ऑगस्टपासून नागपुरात व्ही.शांताराम चित्रपट महोत्सव

नागपूर: ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल अंतर्गत नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि पुणे फिल्म फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कवि कुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, परसिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांतराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप’ आयोजित करण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने विभूषित व्ही. शांताराम यांनी मूकपटाच्या काळात कारकिर्दीस सुरुवात केली. पहिले प्रभात व नंतर राजकमल या निर्मितीसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिले.

ऐतिहासिक व पौराणिक विषयांशिवाय सामाजिक आशय असलेले चित्रपट म्हणजे त्या काळात उचललेले एक क्रांतिकारी पाऊल होते. कुंकू, शेजारी, माणूस, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारह हाथ यासारखे आशयघन चित्रपट त्यातील सामाजिक जाणीवांमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गाजले. तंत्रज्ञानाची उत्तम समज, नावीन्याची आस आणि संगीताची जाण यामुळे त्यांच्या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला. अमरभूपाळी, धर्मात्मा, झनक झनक पायल बाजे, पिंजरा हे अभिरुची संपन्न करणारे त्यांचे चित्रपट कलातीत मानले जातात.

या साऱ्या काळाची आठवण करून देणारा ‘बापू का बायोस्कोप’ हा चित्रपट महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी मेजवानी ठरणार आहे. शनिवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता उद्‌घाटन होईल. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता शेजारी व सायंकाळी ५ वाजता कुंकू हे चित्रपट दाखविण्यात येईल. रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नवरंग, दापरी १ वाजता दो आँखे बारह हाथ चित्रपट दाखविण्यात येईल.

दो आँखे बारह हाथ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका करणारे फिल्मगुरु समर नखाते यावेळी प्रेक्षकांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहतील. अभिजीत रणदिवे व अभिजीत देशपांडे हे चित्रपट समीक्षकसुद्धा प्रत्येक चित्रपटानंतर रसिकांशी संवाद साधतील. महोत्सवाचा समारोप झनक झनक पायल बाजे या चित्रपटाने होईल. गायत्री नगर येथील परसिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात होणाऱ्या व नि:शुल्क असणाऱ्या महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर, आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे.