Published On : Wed, Dec 22nd, 2021

गणित दिनानिमित्त १ ते ३० चे सामुहिक पाढे वाचन बुधवारी

Advertisement

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजन : चिटणीस पार्कवर सुमारे दोन हजार विद्यार्थी होणार सहभागी

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका, अग्रेसर फाउंडेशन व मनी बी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी ‘बे एके बे’ चे १ ते ३० पर्यंतचे भव्य सामुहिक पाढे वाचन होणार आहे. महाल मधील चिटणीस पार्क येथे सकाळी ८ ते ९.३० वाजतादरम्यान हे आयोजन असून यामध्ये शहरातील विविध शाळांचे सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवाडकर उपस्थित राहतील.

गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतीनिमित्त नागपूर महानगरपालिका, अग्रेसर फाउंडेशन व मनी बी इन्स्टिट्यूट द्वारे सामुहिक पाढे वाचनाद्वारे त्यांना श्रध्दांजली दिली जाणार आहे. संपूर्ण शहरात ७५ शाळांमध्ये सामुहिक पाढे वाचन झाले आहेत. शहरात केशव नगर येथे भिंत रंगवण्यात आली आहे तसेच व्ही.एन.आय.टी. समोर व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा समोरील भिंत सुद्धा रंगविण्यात येणार आहेत. रंगविलेल्या भिंतीद्वारे प्रत्येक बालमनाला गणिताच्या जगाशी जोडण्याचा या उपक्रमाचा मानस आहे.

चिटणीसपार्क येथील पाढे वाचनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.