Published On : Sat, Apr 3rd, 2021

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Advertisement

राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री?

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याच्या निर्णयाची घोषणा वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. एका व्हिडिओद्वारे त्यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र यावर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.’