Published On : Sat, May 23rd, 2020

नागपूरचे तापमान ४६.५

Advertisement

नागपूर: विदर्भात उष्णतेची लाट आली असून नागपुरात आज ४६.५ डिग्री तापमानाची नोंद घेतली गेली. त्या खालोखाल अकोला ४६, अमरावती व चंद्रपूर ४५.६ डिग्री तापमान नोंदविले गेले. तीव्र उष्णतेत लोकांनी घराबाहेर पडू नये असा सतर्कतेचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना देण्यात आला आहे.

नागपूर, अकोला, अमरावती व चंद्रपूर या शहरांपाठोपाठ विदर्भात वर्धा ४५.५, गोंदिया ४५.४ तापमान नोंदवण्यात आले आहे. वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरीकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण आधीच आरोग्य यंत्रणेचा करोनासोबतचा लढा सुरू असल्याने तसेच आता येणाऱ्या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परीणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या आहेत. ‘उष्णतेची लाट ‘ ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याबाबतीत आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वत:चे संरक्षण करणे गरजेचे आहे. उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी, थंड (गार) पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, कापडाने डोके झाकावे, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला यांची विशेष काळजी घ्यावी.

Advertisement
Advertisement