Published On : Sat, Jun 6th, 2020

धावत्या रेल्वेत बाळाला जन्म

Advertisement

-बंगळुरवरून जात होते गोरखपुरला
-नागपूर स्थानकावर डॉक्टरांनी केली महिलेची तपासणी

नागपूर: प्रसूतीसाठीच ती माहेरी जात होती. मात्र, धावत्या रेल्वेत तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. ती वेदनेनी तडफळत होती. पती आणि डब्यातील प्रवाशांनी तिला धीर दिला. अन् काही वेळातच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केला. दाम्प्त्यांनी पुढील प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली. ही घटना श्रमिक विशेष रेल्वेत नागपूर जवळ घडली. बाळ आणि बाळंतीन सुखरुप आहे.

किरण कुमार (रा. मिर्झापूर,उत्तरप्रदेश) असे त्या बाळंतीनीचे नाव आहे. पती कमलेश कुमार आणि किरणकुमार ०७३५५ बंगळुर-गोरखपुर श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीच्या एस १४ कोचने प्रवास करीत होते. ती प्रसूतीसाठीच घरी जात होती. नागपूर रेल्वेस्थानक येण्यापुर्वी या महिलेस प्रसुतीच्या कळा आल्या. ती वेदनेनी तडफळत होती.

गाडीतील अन्न वितरण करण्यासाठी नेमण्यात आलेले रेल्वे कर्मचारी राशिद अली यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. ही गाडी सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर आली. परंतु तो पर्यंत या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला होता. गाडीतील सहप्रवासी महिलांच्या मदतीने प्रसूती सुखरुप झाली.

नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. बाळ आणि बाळंतीन सुखरुप होते. महिलेस योग्य तो औषधोपचार दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी उतरण्यास सांगितले. परंतु त्या दाम्प्त्यांनी प्रवास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली.