Published On : Sat, Jun 6th, 2020

लॉक डाऊन च्या काळात १७५ गुन्हे दाखल करून ३०२ आरोपींना अटक

Advertisement

रामटेक पोलिसांची कारवाई…..

सर्व प्रकारच्या गुन्ह्यांद्वारे एकूण ३८, ३७, ७१0 रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त …


रामटेक :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाकडून कलम १४४ सीआरपीसी प्रमाणे लॉकडाऊन आदेश निर्गमित करण्यात आला. या आदेशाची सर्वत्र अंमलबजावणी करीत असताना लॉकडाऊनदरम्यान शहर व गावातील लोक रस्त्यावर येऊ नये, याकरिता चौकाचौकात व मौक्याच्या जागी नाकाबंदी तसेच सतत पेट्रोलिंग करीत सुरक्षेच्या दृष्टीने विनाकारण कोणीही घराबाहेर पडणार नाही. याची खबरदारीचे प्रयत्न रामटेक पोलिस करीत आहेत. कलम १४४ सी.आर.वी.सी. प्रमाणे लॉकडाऊन आदेश निर्गमित केले. त्यानंतर रामटेक पो.स्टे. हद्दीत पोलिसांनी धडक मोहिम राबवून विविध गुन्ह्यांची नोंद घेण्यात येऊन कायदा मोडणार्‍या विरूद्ध कारवाई करण्यात आली.

विनाकारण शहरात व गावामध्ये वाहनांवर फिरणार्‍यांविरुद्ध कलम १८८, २६९ भा.द.वि.चे एकूण २४ गुन्हे आतापर्यंत नोंदवित ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांतर्गत एकूण ३३ गुन्हे दाखल केले व त्यात १२८ आरोपींना अटक करून आरोपींकडून एकूण १६,१६,९८0 रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. दारू बंदी कायद्यांतर्गत ११८ गुन्हे दाखल करीत १४१ आरोपींना अटक करीत आरोपींकडून गुन्ह्यातील वाहने व २२,४३१ लिटर देशी-विदेशी तसेच गावठी मोहफूल दारू, असा एकूण २२,९८,२१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अशा प्रकारे १७५ गुन्हे दाखल करून ३०२ आरोपींना अटक करत एकूण ३८, ३७, ७१0 रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपविभागीय पोलिस अधिकारी नयन अलुरकर यांच्या मार्गदर्शनात पो.स्टे. रामटेकचे ठाणेदार दिलीप ठाकूर व त्यांचे अधिनस्त, अधिकारी, कर्मचारी, सतत पेट्रोलिंग, नाकाबंदी करून अवैध धंदे चालविण्यार्‍यांवर वचक ठेवीत नियमितपणे कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी पोलिस कर्मचार्‍यांना दिले आहेत.

पोलिस प्रशासन व अन्य विभागाद्वारे या कारवाईचे परिणामी आतापर्यंत रामटेक शहरात संचारबंदी दरम्यान अनुचित घटना घडली नसून पुढील काळात नागरिकांनी स्वत:चे सुरक्षिततेसाठी सतर्क राखण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे. कोरोना लढ्यात कोरोना योद्धा म्हणून, पोलीस अतिरिक्त निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, पीएसआय , मीनल बारंगे, अतुल कावळे, श्रीकांत हत्तिमारे, प्रमोद कोळेकर, सीमा बेंद्रे, सर्व पोलीस स्टाफ , सुरक्षा रक्षक व होमगार्ड यांनी सहकार्य केले आहे व सहकार्य करणे सुरूच आहे.

“बाहेर निघतांना मास्क लावणे, खूप आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे, सोशल डीस्टसिंग पाळणे, हात स्वच्छ धुणे व कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला पुरेपूर मदत करण्याचे “आवाहन, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी संपूर्ण जनतेला केले.