Published On : Mon, Feb 10th, 2020

आरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : बावनकुळे

Advertisement

नागपूर: ब्हिगणघाटातील नंदोरी चौकात गेल्या 2 फेब्रुवारी रोजी एका पिसाट युवकाने प्राध्यापक असलेल्या युवतीवर पेट्रोल टाकून जाळल्या प्रक़रणी सदर युवतीचे आज सकाळी निधन झाले. या प्रकरणी आरोपीला महिनाभरात कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मेडिकल इस्पितळात जाऊन या युवतीच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले व तिला श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी ते म्हणाले- अशा घटनांची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व बाबींचे पालन करून कडक कायदा करण्यात यावा व आरोपीला महिनाभरात शिक्षा देण्यात यावी. अत्यंत गंभीर अशी घटना असून या परिवारातील व्यक्तीला शासनाने नोकरी द्यावी आणि आर्थिक मदतही करावी अशी मागणीही माजी पालकमंत्र्यांनी केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून ही युवती मृत्यूशी झुंज देत होती. आज अखेर काळाने तिच्यावर झडप घातली. या प्रक़रणीत समाजात तीव्र संताप असून युवतीच्या दारोडा या गावात नागरिकांना दगडफेक करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहे. शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी व शक्य तेवढ्या लवकर आरोपींना शिक्षा द्यावी असेही ते म्हणाले.

युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा : ना. गडकरी

हिंगणघाट येथे 2 फेब्रुवारी रोजी एका माथेफिरू युवकाने उच्चशिक्षित युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याच्या घटनेतील युवतीचे आज सकाळी दुर्दैवी निधन झाले. ही घटना समाजाला काळिमा फासणारी असून या प्रक़रणी महाराष्ट्र शासनाने युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा अशी कारवाई करावी, अशी भावना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

आठ दिवस या युवतीने मृत्यूशी झुंज दिली. महिलांवर होणार्‍या अशा घटनांविरोधात कायदे अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कायद्याच्या भीतीमुळेच या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेबाबत महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेत कारवाई करावी असेही ते म्हणाले.