Published On : Fri, Jun 23rd, 2017

नारायण राणेंच्या पोस्टरवरून कॉंग्रेस गायब

Advertisement


सिंधुदुर्ग:
तब्बल 12 वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकत्र येत आहेत. निमित्त आहे सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमीपूजनाचे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी आणखी एक घटना घडली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या पोस्टरबाजीत नारायण राणे यांच्या पोस्टरवरून कॉंग्रेस गायब झाली आहे.

सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज (शुक्रवार) मोठ्या धुमधडाक्यात पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे एका व्यासपीठावर येणे हे या कार्यक्रमाचे आकर्षण असले तरी, केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. त्यामुळे नेमका हाच धागा पकडत स्वत:ला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणवून घेणाऱ्या नारायण राणे यांच्या पोस्टरवरून कॉंग्रेसच गायब झाली आहे.

राणेंच्या मनात काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून राणे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेदरम्यानच राणेंचे ज्येष्ट पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजिनामा दिला. त्यानंतर ही चर्चा अधिकच वाढली. मात्र, राणेंनी आपण कॉंग्रेसमध्येच राहणार असून पक्षांतराचा विचार नाही. नेतृत्वाबद्धल नाराजी जरूर आहे. ही नाराजी पक्षनेतृत्वाच्या कानावर घातली जाईल, असे सांगितले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या निमीत्ताने राणेंच्या पोस्टरवरून कॉंग्रेसच गायब झाल्यामुळे राणेंच्या मनात काय आहे, चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायण राणे यांच्याकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज आणि पोस्टरवर केवळ तीन फोटो झळकत आहेत. ज्यात एक शुभेच्छुक म्हणून स्वत: नारायण राणे आहेत आणि दुसरे दोघे चक्क मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस, केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी आहेत. ‘भुमिपूजन सोहळा, मुंबई-गोवा रस्त्याचे चौपदरीकरण’, शुभेच्छा…! शुभेच्छुक नारायण राणे. माजी मुख्यमंत्री, आमदार, विधानपरिषद इतकाच मोजका उल्लेख असलेल्या पोस्टरवर कॉंग्रेसचा पुसटसाही उल्लेख नाही. या पोस्टरवर ना कॉंग्रेसचा लोको आहे, ना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असा नारायण राणेंचा उल्लेख. त्यामुळे हे पोस्टर कोकणातील राजकीय वर्तुळात सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.