Published On : Tue, Nov 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाठोड्यातील SUSBDE कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू!

Advertisement

वाठोड्यातील SUSBDE कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू!नागपूर : कचरा वर्गीकरण प्लांटमध्ये काम करताना झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. वाठोडा परिसरातील बिडगाव रोडवरील SUSBDE कंपनीच्या प्लांटमध्ये मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. ट्रॉमल मशीनची सफाई करताना पाय घसरल्याने कामगार मशीनमध्ये अडकला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. सलमान अयुब खान असे मृत कामगाराचे नाव असून, तो भांडेवाडी येथील अंतुजीनगर परिसरात राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता सलमान हा सहकारी कामगार अक्षय बेलकर याच्यासोबत प्लांटमधील ट्रॉमल मशीनवर कचरा साफ करण्यासाठी चढला होता. सफाईचे काम सुरू असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो मशीनमध्ये अडकला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी सलमानला तातडीने पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच प्लांट परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या नातेवाइकांनी आणि उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती लक्षात घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली आणि योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, नागपूर महापालिकेने शहरातील कचरा वर्गीकरणाचे काम SUSBDE कंपनीकडे सोपविले आहे. या प्लांटमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मशीनची साफसफाई करताना आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध होती का? मशीन बंद ठेवूनच काम केले जात होते का? तसेच कामगारांना आवश्यक प्रशिक्षण आणि सुरक्षा साधने देण्यात आली होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, मृताचे वडील अयुब खान यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या परिस्थितीचा तपास करण्यात येत असून, प्लांटमध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते की नाही, याचीही चौकशी केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.