उल्हासनगर : भाजपला मोठा धक्का देत शिवसेना आणि टीम ओमी कलानी (टीओके) यांनी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. शनिवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
उल्हासनगरच्या राजकारणात कलानी कुटुंबाचे वजन कायमच निर्णायक राहिले आहे. अनेक वर्ष तुरुंगात राहिलेले माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी हे सध्या बाहेर असल्याने पुन्हा सक्रिय झाले आहेत. महापालिका आणि विधानसभेत कलानी व भाजप यांच्यातील कटु संबंध सर्वश्रुत आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान टीओके ने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साथ दिली होती. त्यानंतर शिंदे-कलानी यांची जवळीक वाढत गेल्याने शहरात “दोस्ती का गठबंधन”चे बॅनरही झळकले होते.
अलीकडेच धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या खा. श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यासोबत एका वाहनातून प्रवास केला होता. त्यानंतर कलानी यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन शहरातील प्रश्नांवर चर्चा केली होती. दुसरीकडे, भाजपने कलानींचे काही निष्ठावंत आपल्या पक्षात दाखल करून त्यांना धक्का दिला होता.
मात्र, अचानक कलानी यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना-टीओके युतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना थेट कलानींसोबत खांद्याला खांदा लावून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घडामोडीमुळे उल्हासनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव होणार असून, भाजपची पुढची रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.