नागपूर : शहरातील ताजबाग परिसरातील झोमॅटो बॉयला चाकूच्या धाकावर लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माहितीनुसार,ताजबाग परिसरातील एका ग्राहकाने झोमॅटोवर पेस्ट्रीचा ऑर्डर दिला.झोमॅटो बॉय पेस्ट्री देण्यासाठी ग्राहकाकडे गेला असता चक्क त्याला चाकूच्या धाकावर लुटले गेले.कमलराव नथ्थूराम सिन्हा (२१) रा. येरखेडा, नवीन कामठी, नागपूर असे झोमॅटो बॉयचे नाव आहे. तर रिजवान उर्फ रिज्जू रहमत बेग (१९) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रिजवान याने झोमॅटो ॲपवरून २ मे रोजी दुपारी पेस्ट्रीचा ऑर्डर केला. ही पेस्ट्री सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील यासीन प्लाॅट, फारूख पानठेल्याचे मागे, ताजबाग येथे उपलब्ध करण्यास कळवले गेले. कमलराव सिन्हा हे पेस्ट्री घेऊन त्याठिकाणी पोहोचले. परंतु आरोपीने चाकूचा धाक दाखवून झोमॅटो बॉयचा मोबाईल फोन ५०० रुपये रोख, पेस्ट्री असा एकूण २४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला.
या घटनेची तक्रार कमलराव यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला. आरोपी पळून अमरावतीतील गाडगे नगर हद्दीत लपल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून तेथे आरोपीला अटक केली. ही कारवाई नागपूर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्ता (डिटेक्शन), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रमेश ताले, वैभव बारंगे, सतिश, युवानंद, पुरूषोत्तम, चेतन यांनी सायबर पथकाच्या मदतीने पार पडली .