Representational Pic
मुंबई: भर उन्हात चालताना आपल्याला स्वतःची सावली अनुभवता येते. या उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्या पडलेल्या मुलांचा हा एक विरंगुळाच असतो. मात्र येत्या १५ मे रोजी मुंबईकरांना शून्य सावली घटनेचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईकरांची सावली त्यांच्या पायाखालून हरवेल. राज्यात ६ मे ते २६ मे या कालावधीमध्ये विविध शहरे आणि गावांमध्ये हा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे या दिवसांत तुम्हाला सावली पाहता येणार नाही.
खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या शून्य सावली खगोलीय घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, वेगवेगळ्या अक्षांशावर असणाऱ्या वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या दिवशी हा अनुभव घेता येणार आहे. २३.५ उत्तर व २३.५ दक्षिण अक्षांश असणाऱ्या प्रदेशात वर्षातून दोन वेळा असा अनुभव घेता येतो. सूर्याची क्रांती जेव्हा आपल्या गावच्या अक्षांशाएवढी होते तो दिवस त्या गावी शून्य सावलीचा असतो. १५ मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर १९ असणार आहे. मुंबईचे अक्षांशही उत्तर १९ आहेत म्हणून १५ मे रोजी मुंबईत ‘शून्य सावलीचा दिवस’ असेल. २८ जुलै रोजी पुन्हा सूर्य उत्तर १९ अक्षांशावर येणार आहे परंतु तो दिवस पावसाळ्याचा असल्याने शून्य सावलीचा अनुभव त्यावेळी घेता येणार नाही.
पुढील दिवशी दुपारी मध्यान्हाला उन्हात उभे राहिल्यास शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
- ६मे- कोल्हापूर, देवरुख
- ७मे – सांगली, मिरज
- ८मे – रत्नागिरी, कराड
- ९मे – चिपळूण
- १० मे- सोलापूर, अक्कलकोट
- ११ मे- वाई, तुळजापूर
- १२ मे- बारामती
- १३ मे- पुणे, लातूर
- १४ मे- लोणावळा, दौंड
- १५मे – मुंबई, अलिबाग
- १६ मे – कल्याण, ठाणे, डोंबिवली
- १७ मे- शेगाव, नांदेड, परभणी
- १८ मे- पैठण
- १९मे- अहमदनगर, जालना
- २०मे- नाशिक, औरंगाबाद
- २१ मे- मनमाड
- २२ मे- यवतमाळ