| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 24th, 2018

  युवकच नव महाराष्ट्र आणि नव भारत घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  सातारा : तरूणांना योग्य संधी दिली आणि त्यांना व्यसपीठ उपलब्ध करून दिले तर ते कौशल्य सिद्ध करू शकतात. येथील पोलीस प्रशासनाने युथ पार्लमेंटच्या माध्यमातून त्यांना सहभागी करून घेतले व स्पर्धेतील तरूणांच्या विचारांची हीच प्रगल्भता नव महाराष्ट्र आणि नव भारत घडवेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे आयोजित युथ पार्लमेंट बक्षीस वितरण व स्मार्ट पोलिस स्टेशन गौरव समारंभात बोलताना व्यक्त केला.

  यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस स्टेशनची चित्रफित दाखवून माहिती दिली. तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यूथ पार्लमेंटबाबत चित्रफितीद्वारे माहिती दिली.

  कोल्हापूर परिक्षेत्रात सर्वात स्मार्ट पोलिसिंग राबवणारा सातारा जिल्हा हा पहिला जिल्हा ठरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, इंग्रजांच्या काळात पोलीस राज्य करण्यासाठी होते, पण स्वतंत्र भारत देशात पोलीस हे सामान्य जनतेच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे पोलिसांनी उत्तम सेवा द्यावी. अधुनिक तंत्रज्ञान तसेच कृतीशिल पोलीस यंत्रणा ही स्मार्ट पोलिसिंगमागील संकल्पना आहे. राज्यातील अपराध सिद्धतेचा दर ८ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर गेला, ही बाब स्मार्ट पोलिसिंगमुळेच शक्य झाली आहे.

  सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट पोलीस स्टेशन झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच युथ पार्लमेंट तसेच स्मार्ट पोलिसिंग या दोन्ही उपक्रमांचे नियोजन केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी झिरो पेन्डन्सी हा उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.

  यावेळी युथ पार्लमेंट महाअंतिम फेरीमध्ये विजेत्या विद्यालयीन व महाविद्यालयीन संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेतील विद्यालयीन गटामध्ये सुलेखा हायस्कूल बार्शी, पोतदार हायस्कूल सांगली, बापूजी साळुंखे विद्यालय सातारा या विद्यालयांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन गटामध्ये के. बी. पी. महाविद्यालय सांगली, डी. वाय. पाटील महाविद्यालय आकुर्डी, आणि किसनराव महाविद्यालय वाई यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्यांचा देखील आयएसओ व स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तसेच स्मार्ट पोलीस स्टेशन निर्माण करण्यासाठी मदत करणाऱ्या सौर ग्रुपच्या रुपल दाम्पत्याचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

  “ज्ञानाची शिदोरी गडचिरोलीकडे”
  या कार्यक्रमानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या ‘बुके नको बुक द्या’ या संकल्पनेतून जवळपास चार हजार पुस्तके सातारा जिल्ह्यातील जनतेने त्यांना दिली होती. ती पुस्तके गडचिरोली या आदिवासी जिल्ह्याला देण्याचे त्यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे “ज्ञानाची शिदोरी गडचिरोलीकडे” या वाहनास मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि हे वाहन गडचिरोलीकडे रवाना झाले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145