Published On : Sat, Feb 24th, 2018

औषधी वनस्पतींचा डेटा मिळणार आता एका क्लिकवर (विशेष वृत्त)

लक्ष्मणाचे प्राण वाचावे म्हणून संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान द्रोणगिरी पर्वतावर गेला होता, मात्र त्याला नेमकी कोणती वनस्पती आणायची हे माहीत नसल्याने त्याने अख्खा पर्वतच उचलून आणल्याची कथा आपणा सर्वांना माहीत आहेच. निदान संजीवनी वनस्पती ही द्रोणगिरी पर्वतावर आहे एवढी जुजबी माहिती हनुमानाजवळ होती. मात्र अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या नेमक्या कुठे मिळतात हे शोधणे आजही कठीण आहे. मात्र आता हे काम अभ्यासकांसाठी सोपे झाले आहे. महाराष्ट्रात मिळणाऱ्या औषधी वनस्पतींची माहिती आता एका क्लिकवर शोधता येणार आहे.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगांतर्गत ‘डिजिटाईज्ड डाटा बेस ऑफ मेडिसिनल प्लॅन्ट रिसोर्सेस ऑफ महाराष्ट्र’ या प्रकल्पाच्या समन्वयाचे काम आघारकर संशोधन संस्था, पुणे व अन्य 14 संस्थांच्या सहकार्याने 4 वर्षाच्या परिश्रमातून संकलित करण्यात आलेली माहिती आता mpd.aripune.org या वेबसाईटवर अभ्यासकांना पाहता येणार आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी सुमारे 200 विद्यार्थी क्षेत्रीय संकलन कार्यात सहभागी झाले होते. या डेटा बेसमध्ये वनस्पतींच्या 400 प्रजातींचे विश्लेषण केले गेले आहे. त्यापैकी 157 प्राथमिक प्रजातींची विस्तृत अभ्यासासाठी निवड केली गेली आणि उर्वरित 243 प्रजातींना गैर-प्राथमिकता प्रजाती म्हणून लेबल केले गेले; यावेळी शेतीतील उत्पादित लहान प्रजाती आणि तणनाशकांचा विचार केला गेला नाही.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीत औषधी वनस्पतींना फार पूर्वीपासून वापरात आणण्यात येत आहे. आजही आजीबाईंच्या बटव्यातील अनेक औषधी वनस्पतींचा वापर करून घराघरात उपचार केला जातो. जागतिकीकरणामुळे या औषधी वनस्पतीची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व या वनस्पतीच्या संकलनाचे काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे.

व्हिज्युअल बेसिकवर एमएस अॅक्सेस वापरून डाटाबेस प्रोग्राम वापरून ऑनलाइन मॉड्यूल mpd.aripune.org या वेबसाईटवर लोकांसाठी खुले आहे. औषधी वनस्पतींची विशिष्ट माहिती, प्रजाती विशिष्ट डेटा, व्यापार आणि औषधी संसाधने व वनस्पती, प्रत्येक प्रजातींचे वितरण नकाशा, फोटो गॅलरी, हरबोरियम आणि संदर्भ समाविष्ट आहेत. हा डेटाबेस प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षणावर आणि अभ्यासाअंतर्गत प्रजातींचे परिमाणवाचक मूल्यांकन आधारित आहे. यातील माहिती विविध पैलूंसह स्कॅन केली जाऊ शकते. ही माहिती वापरून सुमारे 100 प्रकारचे विविध अहवाल अभ्यासकांना मिळू शकतात. मुद्रण पर्याय प्रत्येक अहवालासाठी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन या डेटा बेसचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह या प्रकल्पात सहभागी वैज्ञानिक, तज्ज्ञ उपस्थित होते.

औषधी वनस्पतीचा हा डेटा बेस वापरण्यास सोपा असून औषधी वनस्पतीचा वापर करणारे, त्यावर संशोधन करणारे आणि अन्य इच्छुक यांनाही उपयुक्त ठरणार आहे. या डेटा बेसवर आधारित “महाराष्ट्रातील महत्वाच्या औषधी वनस्पती” हे पुस्तक आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. अनुराधा उपाध्ये आणि डॉ. विनया घाटे यांनी लिहिले आहे.

Advertisement
Advertisement