नागपूर : उपराष्ट्रपती श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नागपुरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित भारतीय युवा संसदेच्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करत “भारतीय भाषा आणि विकसित भारत २०४७” या संकल्पनेवर ठामपणे भर दिला. भाषिक विविधता हीच भारताची खरी शक्ती असून, मातृभाषेत विचार केल्यानेच देशाच्या प्रगतीला गती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना त्यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे या शहराला राष्ट्रीय चेतनेत विशेष स्थान मिळाल्याचे सांगितले. एका छोट्या उपक्रमापासून मोठ्या राष्ट्रीय चळवळीपर्यंतचा प्रवास “राष्ट्र प्रथम” या भावनेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवा संसद राष्ट्रीय न्यासाच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी सांगितले की, या व्यासपीठामुळे देशभरातील युवक एकत्र येत आहेत आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना अधिक बळकट होत आहे. “भारतीय भाषा आणि विकसित भारत – २०४७” या विषयावर बोलताना त्यांनी प्रत्येक भाषेचा स्वतःचा वारसा असून त्यातूनच भारताचे सांस्कृतिक ऐक्य घडते, असे अधोरेखित केले.
२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी परकीय विचारांवर अवलंबून न राहता आपल्या मुळांपासून नवसर्जन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय भाषा, लिपी आणि सांस्कृतिक ओळख यांवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
संवाद आणि लोकशाहीचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी नमूद केले की मतभेद असले तरी त्यातून विधायक चर्चा व्हावी, संघर्ष नव्हे तर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे. युवा संसद ही नेतृत्व, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे धडे देणारी प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी ही ‘अमृत पिढी’ असून २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या राष्ट्रीय ध्येयात युवा संसद महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी नागपूर येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी तसेच देशभरातून मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





