Published On : Thu, Feb 22nd, 2018

विदर्भात रोजगाराची संधी, संधीपर्यंत पोहचा : ना. निलंगेकर

Advertisement

नागपूर: पूर्वी रोजगाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत होते. रस्ते आणि साधन पूर्वी नसल्याने मराठवाडा, विदर्भात उद्योग नव्हते. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या माध्यमातून मोठमोठ्या उद्योगांची गुंतवणूक विदर्भात आणली. संधी चालून आली आहे. फक्त संधीपर्यंत पोहचण्याचे काम युवकांना करायचे आहे. वेळेला महत्त्व द्या आणि थोडा स्वभाव बदला. यश तुमच्या पायाशी लोळण घालेल, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि फॉर्च्यून फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे आयोजन करण्यात आल आहे. या मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अजय संचेती होते. मंचावर खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, राणी द्विवेदी, कौशल्य विकास विभागाचे कुणाल पडोळे, भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजीव पोतदार, आशीष वांदिले, शुभांगी गायधने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, पूर्वी सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार, असे चित्र उभे केले गेले होते. परंतु आता सरकारने स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी, त्यासाठी विविध योजना आणि बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे रोजगाराची व्याख्याची बदलली आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मुंबई, दिल्लीला जाण्याची गरज नाही. विकास आणि रोजगार आपल्या पुढ्यात आहे. फक्त आपला स्वभाव बदलवून या संधीपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे सांगतानाच, आपली स्वप्न मुलांवर लादू नका, असा सल्ला ना. निलंगेकर यांनी पालकांना दिला.

आ. सुधाकर देशमुख म्हणाले, विविध योजनांचे एकत्रीकरण करून युवकांना दिशा देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका आणि फॉर्च्यून फाऊंडेशनच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. युथ एम्पॉवरमेंट समीटच्या माध्यमातून तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य सुरू असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, प्रत्येकात काही ना काही कौशल्य आहे. ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे. ज्यात कौशल्य नाही त्याच्या मागे रोजगारासाठी धावण्यात अर्थ नाही. जे कौशल्य आहे, त्यात करिअर बनविण्याचा विचार करा. त्यासाठी मेहनत करा, हे सांगताना त्यांनी शेफ विष्णू मनोहरसारख्या काही व्यक्तींचे उदाहरण सांगून ही मंडळी आपल्या कौशल्याच्या बळावरच आज आकाशाला गवसणी घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात खासदार अजय संचेती यांनी युथ एम्पॉवरमेंट समीटचे महत्त्व सांगत अशा समीटच्या माध्यमातून आमदार अनिल सोले यांच्यासारखे व्यक्ती युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

प्रारंभी प्रास्ताविकातून फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले यांनी संपूर्ण आयोजनामागची भूमिका विषद केली. मागील चार वर्षांपासून रोजगार देण्याचा हा यज्ञ अविरत सुरू आहे. मागील वर्षी ९०० च्या वर युवकांना विविध कंपन्यांची नियुक्ती पत्रे याच ठिकाणी देण्यात आली. यावर्षी हा आकडा पाच हजारांवर जाण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे औपचारिक उद्‌घाटन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत कामडे यांनी केले. आभार स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला युवा वर्गाची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

‘स्पर्श’ला राज्यस्तरीय सन्मान

कार्यक्रमात स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कपिलकुमार आदमने आणि संस्थेच्या सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नेहरू युवा केंद्र संघटनच्या राज्य संचालक संध्या देवतळे यासुद्धा यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

ना. गडकरींचेही मार्गदर्शन

‘युथ एम्पॉवरमेंट समीट’च्या उद्‌घाटन कार्यक्रमाला ना. नितीन गडकरी उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांचा व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही. माणूस कोणीही असो, क्षेत्र कुठलेही असो, आकाश गाठायचे असेल तर गुणवत्ता आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.