
नागपूर -नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रदुमसिंग असे मृत तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील रहिवासी होता. अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
ही घटना २१ सप्टेंबरच्या रात्री पगारिया बिल्डिंगजवळील जबलपूर महामार्गाच्या कटिंग परिसरात घडली. प्रदुमसिंग आणि तक्रारदार पवन कुमार चौहान हे दोघेही उत्तर प्रदेशातील असून, नागपुरात एकत्र काम करत होते आणि एकाच खोलीत राहत होते.
घटनेच्या वेळी प्रदुमसिंग हा मित्राची इलेक्ट्रिक बाईक घेऊन एकटाच बाहेर पडला होता. यावेळी अज्ञात चारचाकी वाहनाने कथितरित्या भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या बाईकला धडक दिली. या धडकेत प्रदुमसिंग गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




