
नागपूर : भारतासह जगभरात आज 11वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नागपूर येथे भव्य राष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना ‘निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ अशी आहे.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. परंपरेपासून ज्ञान, वैज्ञानिक पुरावे आणि नवोपक्रमाकडे झालेला आयुर्वेदाचा प्रवास भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य आणि कल्याण सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे पंतप्रधानांनी संदेशात नमूद केले.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, केंद्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. वैद्य रबिनारायण आचार्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘आरोग्याचे पहिले केंद्र रुग्णालय नसून आपले घर आहे’, असे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक आरोग्य निगा आणि निरोगी जीवनशैलीला देशव्यापी जनचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात ‘आयुष व्हिजन 2030’, आयुष सेवा क्षेत्रावरील अहवाल, आयुर्वेदाशी संबंधित संशोधन अहवाल तसेच सीसीआरएएस-अग्नी वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. गोक्षुरा आणि चंद्रासुरा यांच्यावरील सुरक्षा दस्तऐवज तसेच त्वचारोगांवरील प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वेही प्रकाशित करण्यात आली.
आयुर्वेदाचे भविष्य वैज्ञानिक पुरावे, संशोधन, नवोपक्रम, गुणवत्ता, सुरक्षितता आणि मानकीकरणाशी जोडलेले असल्याचे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. नागपूर येथे झालेल्या या राष्ट्रीय सोहळ्यात देशभरातील आयुर्वेद चिकित्सक, संशोधक, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले.




