Published On : Mon, Jun 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बार बाहेर तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉड व बाटलीने फोडले डोके, तिघांना अटक

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हल्बा बार अँड रेस्टॉरंटबाहेर झालेल्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण करत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड आणि काचेच्या बाटलीने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतवारी परिसरात सराफा व्यवसाय करणारे रुपेश सोनी हे त्यांचे मित्र विवेक बोत्रा यांच्यासोबत हल्बा बार अँड रेस्टॉरंटमध्ये बसले होते. यावेळी शेजारच्या टेबलवर बसलेल्या चार तरुणांशी मोठ्याने बोलण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. वाद वाढू नये म्हणून रुपेश आणि त्यांच्या मित्राने संबंधित तरुणांची माफीही मागितली होती.

Gold Rate
June 01- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 156,200 /-
Gold 22 KT ₹ 1,44,900 /-
Silver/Kg ₹ 2,62,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र बारमधून बाहेर पडताच आरोपींनी रुपेश यांना गाठून त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी लोखंडी रॉड आणि काचेच्या बाटलीने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रुपेश गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रुपेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तपासादरम्यान पोलिसांनी वीरल मजेठिया, रौनक बदानी आणि कौस्तुभ येडे या तिघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा शर्मा हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली आहेत. घटनेमागील नेमके कारण आणि इतर पैलूंचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges