Published On : Thu, Jun 24th, 2021

लिज्जत पापड लाटणाऱ्या महिला कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात आपचे निवेदन

नागपुर – श्री महिला गृह उदयोग लिज्जत पापड या कंपनीत पापड लाटणाऱ्या महिला या कंपनीच्या भागधारक असून गेल्या २७ वर्षापासून निरंतर काम करित आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यां घेऊन आम आदमी पक्ष कार्यालयात आपली गाऱ्हाणी समस्यां सांगितल्या आणि न्याय मिळवून देण्याचा आग्रह धरला. त्या अनुषंगाने त्यांच्या समस्यां घेऊन संचालिका श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड , नंदनवन येथे चर्चा करून निवेदन देण्यात आले.

आज त्यांना पापड लाटण्याकरिता नागपूरला प्रतिकिलो दर रु ४६ मिळतो परंतू मुंबईला हाच प्रतिकिलो दर रु ५५ आहे . वाढती महागाई लक्षात घेता प्रतिकिलो रु ६० प्रमाणे मजुरी दयावी, त्यांना पिठ मळून मोजून दिले जाते त्यामध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामूळे पापड लाटून सुकविल्यानंतर त्यात घट होणे अपेक्षित आहे.

त्यामूळे प्रति किलो मागे फक्त ५० ग्रॅम घट ग्राह्य धरावी, पापड लाटणाऱ्या महिलांना नियुक्ती पत्र दयावे, कंपनी नियमानुसार वैद्यकिय विमा मिळावा, दरवर्षी एक जूनला वाढीव दराने प्रति किलो दरवाढ करावी, दरवर्षी वाढीव दराने बोनस मिळावा , कंपनी कायद्यानुसार महिला कामगारांचा कामगार भविष्य निर्वाह निधी कपात करण्यांत यावी व तेवढीच रक्कम कंपनीने भरावी, १५ दिवसांऐवजी एक महिन्याचे वेतन बँकेमार्फत मिळावे या मागण्यांवर चर्चा करून त्या संदर्भात आम आदमी पक्षाचे प्रभाग ६ चे अध्यक्ष *मोरेश्वर मौंदेकर* यांच्या नेतृत्वात श्रीमती शालन आमले, संचालिका श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड, नंदनवन नागपूर यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, नागपुर शहर सहसंयोजक डॉ शाहिद जाफरी , उत्तर नागपूर संयोजक डोंगरे, सह-संयोजक विजय नंदनवार , संघटन मंत्री प्रदीप पौनीकर, महिला संयोजक स्विटीताई इंदोरकर व पापड लाटणाऱ्या महिला प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित होत्या . या महिलांना योग्य न्याय न मिळाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री. जगजीत सिंग व डॉ शाहिद जाफरी यांनी दिला.