नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. यानिमित्ताने काल दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी उसळली होती. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतिदर्शी कार्य पूर्ण केले.
त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जय बुद्ध व जय भीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी परिसर अनुयायांनी दणाणून सोडला होता .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेला यंदा ६७ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त २४ ऑक्टोबर, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीत दाखल झाले.
यंदा दीक्षाभूमीवर येणाऱ्या परराज्यातील नागरिकांमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमधील अनुयायांची संख्या अधिक होती. दीक्षाभूमीत पार पडलेल्या सोहळ्यात श्रीलंका येथील रेव्ह डब्ल्यू धम्मरत्न थेरो प्रमुख आकर्षण असतील. तर थायलंड येथील डॉ. अफिनिता चाई चाना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्री सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.