नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेट्री परिसरात शुक्रवारी खळबळ उडाली. ओयो हॉटेलमधील एका खोलीत तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. ही हत्या तरुणीच्या प्रियकराने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीने पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे.
पोलिस सूत्रांनुसार, संबंधित तरुण-तरुणी गुरुवारी राहुल सर्व्हिस अपार्टमेंट-१ या ओयो हॉटेलमध्ये मुक्कामी आले होते. चेक-इननंतर काही वेळातच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोघांचे समुपदेशन केले. पुढे कोणताही त्रास होणार नाही, असे आरोपीने आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती तात्पुरती शांत झाली होती.
मात्र, रात्रीच्या सुमारास आरोपीने खोलीतच तरुणीची हत्या केल्याचा संशय आहे. त्यानंतर आरोपीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पलायन केल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी सकाळी चेकआऊटसाठी वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी खोलीत तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) येथे पाठवण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले असून पुढील तपास सुरू आहे.









