मुंबई – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याआधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) त्यांना या प्रकरणातून क्लिनचिट देण्यात आली होती.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ आणि इतर आरोपींकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता. ईडीने हा अर्ज मंजूर करत भुजबळ यांना या प्रकरणातून पूर्णतः दिलासा दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर आता अखेर पडदा पडल्याचे मानले जात आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथित घोटाळ्याची रक्कम सुमारे ८५० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात भुजबळ यांच्यासह एकूण १४ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. आरोपांच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना दोन वर्षे कारागृहातही जावे लागले होते.
मात्र, तपासाअंती या प्रकरणात भुजबळ यांचा थेट सहभाग सिद्ध न झाल्याने प्रथम एसीबीकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ यांना क्लिनचिट दिल्याने त्यांच्यावरचा कायदेशीर आणि राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
ईडीकडून मिळालेल्या या दिलाशामुळे छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा वादग्रस्त अध्याय संपुष्टात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









