तिसऱ्या जागतिक योग दिनाचे आयोजन,हजारो नागपूर योगसाधकांची उपस्थिती

Advertisement

नागपूर: सदृढ तन आणि मनाच्या जडणघडणीसाठीची योग ही भारताची प्राचीन साधना असून, या साधनेचे मानवी जीवनातील महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ही साधना जागतिक योग दिनाच्या माध्यमातून जगभर प्रसारीत होत आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी योगाचा संकल्प करुया, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, डॉ. दीपक म्हैसेकर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशवंत स्टेडीयम येथे नागपूर महानगरपालिका व जनार्दनस्वामी योगाभ्यास मंडळ यांच्या वतीने तिसरा जागतिक योग दिन आयोजित केला होता.

नितीन गडकरी यांनी सुरुवातीला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा करुन तो महानगरपालिकेकडे देण्यासंदर्भातील उपस्थितांना शपथ दिली. जपान, चीन, पाकिस्तान यासारखे जगातील बहुसंख्या देश भारतातील योग विज्ञानाचा अभ्यास करुन योगसाधना करीत आहेत. योगामुळे शरीर व मन स्वस्थ राहते. त्याने आत्मबल वाढते. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन वास्तव्य करते.

त्यामुळे सर्वांनी नित्यनेमाने योगसाधना करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बगीचे, शाळा, महाविद्यालय, तसेच सभोवती असलेल्या परिसरामध्ये योग साधनेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या ठिकाणी असलेल्या सुविधांचा लाभ घेऊन, आपले शरीरस्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी योग उपयोगात येईल. यासाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी योग करण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.

जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सकाळी पाच वाजेपासून आबालवृध्दांनी मोठ्या संख्येने यशवंत स्टेडीयम येथे गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रीय कॅडेट कोर्स, वंडर्स युनिटी योगाभ्यासी मंडळ, विराट योग संमेलन, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अमित स्पोर्टींग, यांच्यासह विविध योगाभ्यासी मंडळांच्या योगसाधकांनी विविध योगकवायती सादर केल्या. तिसऱ्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला विदेशातील योगसाधकांची प्रमुख उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी नागपूरकर योगसाधक व योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.