Published On : Fri, Aug 10th, 2018

डिसेंबरपर्यंत येरखेडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार : पालकमंत्री

Advertisement

नागपूर: येत्या डिसेंबरपर्यंत येरखेडा गावातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांना या पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळणार आहे. यासाठी शासनाने 17 कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

येरखेडा व रनाळा येथे जनतेशी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. येरखेडा येथे ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोरील पटांगणात तर रनाळा येथे पंकज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. येरखेडा येथे सरपंच श्रीमती कारेमोरे, अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, उपसरपंच व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी नागरिकांकडून समस्यांच्या तक्रारींचे अर्ज मागविले होते. शेकडो नागरिकांनी या कार्यक्रमात आपले अर्ज दिले. जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या सर्व तक्रार अर्जावर प्राधान्याने कारवाई करून कारवाईची माहिती मला द्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी तालुका प्रशासनाला दिले. रस्ते पूल, नवीन लेआऊटमधील नियमितीकरण या अर्जांवर त्वरित कारवाई करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले.

गावातील शासकीय जागेवर घरे बांधलेल्या नागरिकांना नि:शुल्क पट्टे वाटप करण्याचा शासनाच्या निर्णयाची माहिती गावतील जनतेला दिली. त्यानुसार सदाशिवनगर, रविदासनगर, मरारटोली या भागातील नागरिकांना पट्टे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गृह विभागाकडे आलेल्या अवैध दारूबंदीच्या अर्जावर कारवाई करून तीनदा अवैध दारू पकडण्यात आलेल्या आरोपीला मोक्का लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बांधकाम विभागाचे 8 अर्ज आले असून त्यातून 65 कोटीचा पूल आणि अंतर्गत रस्ते बांधकाम शासन करणार आहे. 19 किमीचे रस्ते अंतर्गत रस्ते बांधून देण्यात येतील. महावितरण आणि पुरवठा विभागाचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

समाज कल्याण विभागांतर्गत आलेल्या अर्जांवर कारवाई करून अपंगांना 70 हजाराची बॅटरीवर चालणारी सायकल देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. तसेच आतापर्यंत 1200 अपंगांना सायकली देण्यात आल्या. आरोग्य विभाग, भूमिअभिलेख, रोजगार हमी या विभागातूनही काही प्रमाणात अर्ज आले होते. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 117 कुटुंबांना गॅसचे कनेक्शन देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी गावातील उपस्थित बहुसंख्य महिला आणि पुरुषांना थेट संवाद साधण्याची संधी देऊन त्यांच्या तक्रारी ऐकून त्यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.