Published On : Fri, Aug 10th, 2018

छावनी क्षेत्रात शासनामार्फत विकास करणार : बावनकुळे

Advertisement

नागपूर: राज्यातील छावणी परिषद क्षेत्रात राज्य शासनामार्फत विकास कार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला असून कामठी छावणी परिसरात मोठ़्या प्रमाणात विकास कार्ये करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कामठी छावणी परिषद येथे उभारण्यात आलेल्या नवीन सामान्य रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डिफेन्स इस्टेट सदर्न कमांडचे प्रधान सचिव एल. के. पेगु, छावनी परिषदचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी. व्ही. सिंग, उपाध्यक्ष दिनेश स्वामी, सदस्य सुनील फ्रांसिस, दीपक सिरीया, सीमा यादव, विजयालक्ष्मी राव, चंद्रशेखर लांजेवार, छावनी परिषदेचे मुख्याधिकारी अमितकुमार माने, नप कामठीचे अध्यक्ष शहाजहा शफाअत प्रामुख्याने उपस्थित होते.

कामठ़ी छावणी परिषद क्षेत्रात विविध शासकीय योजनांसह प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येईल. यासाठी छावणी परिषदेने आवश्यक तो प्रस्ताव सादर करावा. कामठी वारेगाव रस्ता, येरखेडा रनाळा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, वारेगाव महादेव मंदिर, जुनी कामठी रस्ता, नागपूर कन्हान चौपदरीकरण रस्ता, कामठी कैंट मेट्रो स्टेशन याबाबत छावणी परिषद सोबत तोडगा काढण्यात येईल, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

नवीन कामठी छावणी हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी, प्रसूती कक्ष, शल्यचिकित्सा क्रिया कक्ष व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उत्कृष्ट दर्जाची रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

याप्रसंगी डिफेन्स इस्टेट सदर्न कमांडचे प्रधान सचिव एल. के. पेगू यांनी मार्गदर्शन केले व विकास कामे करण्यास पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अमितकुमार माने यांनी तर आभार उपाध्यक्ष दिनेश स्वामी यांनी मानले.

यावेळी सैन्य अधिकारी छावणी परिषद क्षेत्रातील मान्यवर नागरिक, तसेच कामठी भाजपा शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, डॉ. अरुंधती काळे, डॉ. विवेक कुरहाडे, दीपक ठाकरे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. विवेक चंदनानी, गोपाल यादव, अजय कदम, कमल यादव उपस्थित होते.