पुसद (यवतमाळ)। नुकतेच स्थापनेचे अमृत महोत्सव साजरे करणार्या राज्यातील सहकारी बँकांचे संघटन असलेल्या दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई च्या संचालक पदी पुसद अर्बन कॉ. ऑप. बँकचे शरद मैंद यांची अविरोध निवड झाली.
असोसिएशनच्या 21 संचालक पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर अमरावती विभागातील एक जागेसाठी शरद मैंद यांच्यासह असोसिएशनचे जेष्ठ संचालक मधुकरराव जवंजाळ व शिलाताई सांबरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. अशा वेळी युवा कार्यकत्याला संधी देण्याच्या हेतूने दोन्ही जेष्ठ संचालकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शरद मैंद यांची अविरोध निवड झाली.
मागील कार्यकारिणी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असोसिएशनवर 47 संचालक निवडून येत होते. मात्र 97 व्या घटना दुरुस्तीमुळे संचालक 21 पर्यंत मर्यादित झाले. महाराष्ट्रातून निवडल्या जाणार्या केवळ 21 संचालकां मधून पुसद सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालय असलेल्या बँकेच्या अध्यक्षांची असोसिएशनवर संचालक पदी अविरोध निवड होणे हे निश्चितच गौरवाची बाब आहे. बँकेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे अध्यक्ष शरद मैंद यांच्या सारख्या युवा नेतृत्वाला असोसिएशनवर दुसर्यांदा संधी मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. मागील 2010-15 च्या असोसिएशनच्या कार्यकारिणीत ते संचालक होते.
शरद मैंद हे 2002 पासून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष असून त्यावेळेच्या बँकेच्या 84 कोटीच्या ठेवी आज 1000 कोटींच्या टप्यात आल्या आहेत. तसेच त्यावेळच्या 15 शाखांचा आज 38 शाखांपर्यंत कार्यविस्तार करत आहे. शरद मैंद यांच्या जिद्द, चिकाटी व कार्य तत्त्परतेचा महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनला निश्चितच फायदा होईल असा विश्वास येथील सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.