
यवतमाळ: पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी चळवळ, यवतमाळ ग्रामीणच्या वतीने गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी यवतमाळ शहरात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध पोळा बाजारासह प्रमुख चौकांमध्ये आंदोलन करत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
या वेळी ट्रॅक्टरला सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे तोरण बांधण्यात आले होते. तसेच विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
आंदोलकांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्यावा आणि महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
२४ तासांपैकी किमान ८ तास दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही शेतकरी चळवळीच्या वतीने करण्यात आली.
शेतकरी आर्थिक संकटात
सध्या सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादक शेतकरी विविध संकटांचा सामना करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. पिकांचे नुकसान, अपुरा पाऊस, पीक विम्याचा प्रश्न आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा दावा करण्यात आला.
सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शेतकरी चळवळीचे सचिन मनवर, कृष्णा पुसनाके, विकास मनवर, यशवंत वादाफळे आणि प्रा. पंढरी पाठे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रतिनिधी: विनोद पत्रे, यवतमाळ




