
नागपूर : शक्तिपीठ महामार्गासह विविध मुद्द्यांवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रस्ते बांधकामाची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती रोहित पवारांना आहे. मात्र, ही माहिती असूनही ते समाजात नकारात्मकता निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या भागात तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून, नुकसानीच्या अहवालानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
अमरावतीतील घटनेवरही बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या दहा सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, प्राथमिक चौकशीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, प्रकरण येथेच थांबणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समितीच्या शिफारशी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. लहान बाळांच्या केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याची योजनाही आखली जात असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हायकोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पोलिसांकडून उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. चौकशी निष्पक्षपणे झाली असून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचाही सरकार विचार करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. सरकारी जमीन बेकायदेशीररीत्या कोणाच्या ताब्यात जाऊ नये, यासाठीही कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात जात प्रमाणपत्र वाटपासाठी यापूर्वीही शासनाने विशेष शिबिरे घेतली आहेत. नियमांनुसार अशा शिबिरांचे आयोजन करणे हे शासनाच्या धोरणाचा भाग असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी समाजाची मागणी अद्याप त्यांच्याकडे आलेली नसून, मागणी प्राप्त झाल्यास ती ओबीसी समितीसमोर मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील धार्मिक उपक्रमांबाबत भाष्य करण्यास बावनकुळे यांनी नकार दिला. शाळेची नेमकी भूमिका आणि निर्णयाची माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची जबाबदारी आपल्याकडे होती. या दहाही ठिकाणी भाजपचा विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुंबईतील विमानातील मशिदीसंदर्भातील प्रकरणाची माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




