
नागपूर : नागपुरात गोवंशाची कथित अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात यशोधरानगर पोलिसांनी कारवाई केली. टाटा चारचाकी वाहनातून दाटीवाटीने नेण्यात येत असलेल्या ४ गायी आणि १ वासराची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यशोधरानगर पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग तपासणी पथकाने १८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता ऑटोमेटिक चौक परिसरातील ओबेरॉय पॅलेसजवळ संशयास्पद वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात ४ गायी आणि १ वासरू आढळून आले. या गोवंशाची अंदाजे किंमत ८५ हजार रुपये, तर टाटा वाहनाची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जनावरांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने आणि दाटीवाटीने वाहून नेले जात होते. त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी उत्तमनगर, गोरेवाडा येथील ४० वर्षीय राकेश मनोज यादव याच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




