Published On : Fri, Jul 28th, 2017

‘विश्वासमत’मधील लिखाण विश्वासार्ह – मुख्यमंत्री

Advertisement

CM Fadnavis
मुंबई: विश्वास पाठक लिखित “विश्वासमत” या पुस्तकातील लिखाण हे विश्वासार्ह असून सर्वसामान्यांना संदर्भग्रथ म्हणून उपयोगात येणारे या पुस्तकाचे दोन्ही खंड असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज सायंकाळी कार्पेरेट क्षेत्रातील “टर्न अराऊंड मॅन” म्हणून ओळख असलेले व मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक, भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्या “विश्वासमत” या पुस्तकाच्या दोन खंडाचे प्रकाशन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

व्यासपीठावर राज्याचे ऊर्जा व राज्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, भाजपाचे विदेश विभाग प्रभारी डॉ.विजय चौथाईवाले व अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आ.आशिष शेलार, आ.मेधा कुलकर्णी, माजी आ.आशिष जयस्वाल, आ.मल्लिकार्जुन रेड्डी, चरणसिंग ठाकूर, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले- विश्वास पाठकांनी समाजाला काही देण्याच्या भावनेतून हे लिखाण केले आहे. या लेखनावरून व्यवस्थापन क्षेत्रातील लेखकाचा मूळ व्यवसाय लेखनाचा असल्याचे वाटून जाते, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- आव्हाने स्वीकारणे आणि आव्हानांना समोर जातांना उत्तमच काम करावे हा पाठकांचा स्वभावगुण आहे. मनाच्या संवेदनशिलतेचा परिचय वाचकांना या लिखाणातून होईल. तसेच घटनेची अचूक फोड करून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या लेखनातून केला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. एक सिध्दहस्त लेखकच अशा प्रयत्नात यशस्वी होतो असेही ते म्हणाले.

हृदयस्पर्शी पुस्तक: ऊर्जामंत्री
विश्वासमतचे दोन खंड चाळतांना लक्षात येते की सर्वसामान्य माणासाच्या मनाला भिडणारे हे एक हृदयस्पर्शी पुस्तक आहे, अशा शब्दात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पुस्तकातील लिखाणावर आपली पावती दिली. अष्टपैलू गुणांचे धनी असलेल्या विश्वास पाठक यांच्यात कोणत्याही विषयावर भाष्य करण्याची ताकद असल्याचा अनुभव या पुस्तकातून वाचकांना येईल असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

बहुआयामी व्यक्तिमत्व: डॉ.चौथाईवाले
विश्वासमत वाचतांना लेखक विश्वास पाठक हे बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी असल्याचे लक्षात येते, अशी भावना भाजपाचे विदेश विभाग प्रभारी डॉ.विजय चौथाईवाले यांनी व्यक्त केली. केवळ शब्दच्छल नसलेले व सामाजिक जाणिवेची भान ठेवून केलेले हे लिखाण असून अत्यंत क्लीष्ट असलेले विषय सोप्या शब्दात त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. मातीशी, समाजाशी जोडला असेल तोच असे लिखाण करू शकतो, असेही डॉ.चौथाईवाले म्हणाले.

परिणामकारक : मदन येरावार
वृत्तपत्रे आणि ब्लॉगचा माध्यमातून केलेल्या लिखाणाचे 128 लेख या पुस्तकाच्या दोन्ही खंडात असून परिणामकारक व अभ्यासपूर्ण असे लिखाण विश्वास पाठक यांनी केल्याचे प्रतिपादण ऊर्जाराज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. या लिखाणातून पाठक यांनी वाचकांशी संवाद साधला आहे असेही ते म्हणाले.

आपल्या मनोगतातून विश्वास पाठक यांनी लिहिण्याची प्रेरणा आपल्याला वाचकांपासून मिळाली असून वाचकांनीच लिखाणाला प्रवृत्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमेय प्रकाशनचे मकरंद जोशी यांनी मानले. अनेक चाहत्यांनी आणि रसिक वाचकांनी या कार्यक्रमाला चांगली गर्दी केली होती.