Published On : Fri, Mar 16th, 2018

विदर्भ एक्स्प्रेसमधून पावनेतीन लाखांचे दागिने लंपास

Advertisement

Representational Pic


नागपूर: मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार रुपये किंमतीचे दागिने नागपूर रेल्वे स्थानकावरुन चोरी गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटिव्ही फुजेट तपासले मात्र, त्यात काहीच आढळले नाही. मात्र, एका तरुणीवर संशय व्यक्त केला जात आहे.

जयंत देवेंद्र जसानी (७१, रा. गोंदिया) असे प्रवाशाचे नाव आहे. ते पत्नीसह मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने गोंदियाला जात होते. ए३ बोगीतील ३७, ३९ या बर्थवरुन ते प्रवास करीत होते. विदर्भ एक्स्प्रेस सकाळी फलाट क्रमांक २ वर आली. दरम्यान जयंत बाहेर आले. त्यांची पत्नी बर्थवर झोपली होती. त्यांच्या उषाखाली असलेली पर्स संशयीत तरुणीने चोरली. पर्स मध्ये सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी (२), मंगळसुत्र डायमंड पेंडालसह, नथ, मनगटी घड्याळ आणि १० हजार रुपये रोख असा एकून २ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. या प्रकरणी गोंदिया लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान सीसीटिव्ही फुटेज तपासले मात्र, फलाट २ वरील सीसीटिव्ही संपूर्ण फलाट कव्हर करीत नसल्यामुळे फुटेजमध्ये काहीच आढळले नाही.

तरुणीवर संशय
नागपूर स्थानकारवर गाडी थांबली तेव्हा एक २० ते २२ वयोगटातील तरुणी गाडीत बसली. जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या त्या तरुणीवर फिर्यादीने संशय व्यक्त केला. अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.