Published On : Wed, Mar 24th, 2021

शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी व म.न.पा.तर्फे जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम संपन्न

Advertisement

नागपूर : २४ मार्च हा दिवस “जागतिक क्षयरोग दिन” म्हणुन साजरा केला जातो. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस नावाच्या जंतुमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. १८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणुंचा शोध लावला व त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.

या दिनाचे औचित्य साधुन शहर क्षयरोग कार्यालय, म.न.पा.नागपूर येथे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांचे अध्यक्षतेखाली क्षयरोग जनजागृती व मुखवटा सेल्फी अभियान (मास्क सेल्फी कॅम्पेन) चे उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे सामान्य नागरिक, ऑटो चालक, बस चालक, दुकानदार, ट्रॅफिक पोलीस यांना क्षयरोग जनजागृती संदेश लिहीलेले मास्क चे वितरण करण्यात आले.

तसेच टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत टीबी प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये लॅटेन टीबी चे निदान व उपचार हा प्रकल्प केंद्रीय क्षयरोग विभाग भारत सरकार, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम नागपूर शहर व ग्रामीण, शेयर इंडिया, सि.डी.सी. अटलांटा यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत वैद्यकिय अधिकारी व आशा कार्यकर्ते यांना लॅटेन टीबी कार्यक्रमाबददल प्रशिक्षण दिले जात आहे.

सदर जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता कार्यालयातील कर्मचारी वर्ग श्री. उत्तम मधुमटके, श्री. तुषार कावळे, श्री. रितेश दातीर, चरीता रामटेके, श्री. विजय डोमकावळे, नेहा सोनटक्के, रजनी निमजे, श्री. अनुप पारधी, श्री.अविनाश थुल यांनी परिश्रम घेतले.