Published On : Sat, Nov 8th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम; खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाने रचला इतिहास!

Advertisement
नागपूर:खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या “जागर भक्तीचा” या आध्यात्मिक उपक्रमांतर्गत गीता परिवार यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित गीता पठण कार्यक्रमाने नागपूरच्या भूमीवर शनिवारी ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. 302 शाळांमधील 5 वी ते 12 वीच्‍या तब्बल 52,559 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भगवद्गीतेचे १२वा, १५वा आणि १६वा अध्याय एकाच सुरात पठण केले.हा सामूहिक पठण सोहळा वर्ल्‍ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या तीन संस्थांनी अधिकृतरीत्या नोंदवला.
ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर झालेल्‍या या उपक्रमाला गीता परिवारचे संस्‍थापक  अध्‍यक्ष श्रीराम जन्‍मभूमी न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज,  केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, सामाजिक कार्यकर्त्‍या व संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचनताई गडकरी,  आमदार प्रवीण दटके, गीता परिवारचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष संजय मालपानी व आंतरराष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष आषुजी गोयल, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले व संयोजक रेणु अग्रवाल यांची उपस्थिती होती. गीतेचे अर्थ, उच्चार आणि तत्त्वज्ञान विद्यार्थ्‍यांना शिकवणारे श्रीनिवास वर्णेकर व वंदना वर्णेकर यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. वर्ल्‍ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे अॅडज्युरिकेटर संजय व सुषमा नार्वेकर, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अॅडज्‍युरिकेटर मनोज तत्‍ववादी यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती.
दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर असलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी गीता पठणाला सुरुवात केली. त्‍यांच्‍या सुरात पटांगणावर असलेल्‍या हजारो विद्यार्थ्‍यांनी सुर मिळसले. या सामूहिक पठणाने वातावरण भारावून गेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍या सर्व पदाधिकारी या उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रयत्‍न केले.
हा अभिमानाचा क्षण – मा. श्री. नितीन गडकरी
गीता पठणाचा हा विश्‍वविक्रमाचा क्षण आनंद आणि अभिमानाचा आहे. भगवद्गीता जीवनाचे तत्‍वज्ञान आहे. लहान मुलांवर गीता पठणातून उत्‍तम संस्‍कार व्‍हावे, जीवन जगयाचा योग्‍य मार्गावर जाण्‍याची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. मागील वर्षी वंदेमातरम व मनाचे श्‍लोकचा विक्रम झाल्‍यानंतर या वर्षीचा हा ऐतिहास‍िक सोहळा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम सर्वांना प्रेरणा देईल.
भगवद्गीता जीवनाची मार्गदर्शिका – स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज
देशाला जागे करायचे असेल तर प्रत्‍येक भागात असे उपक्रम राबवले पाहिजे, असे म्‍हणत स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी नितीन गडकरी यांचे या यशस्‍वी उपक्रमाकरिता अभिनंदन केले. भगवद्गीता ही जीवनाची मार्गदर्शिका असून प्रत्‍येकाने तिचा अवलंब केल्‍यास उत्‍तम, सफल, सार्थक आणि योग्‍य व्‍यक्‍ती घडतील.  जगातील सर्व ग्रंथाचे सार या ग्रंथात आहे, असे म्‍हणत महाराजांनी या उपक्रमात इतक्‍या मोठ्या संख्‍येने विद्यार्थी सहभागी झाल्‍याबद्दल त्‍यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
‘वंदेमातरम्’चाही जागर –
‘वंदेमातरम्’ या राष्‍ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्‍ताने देशभरात हजारोंच्‍या संख्‍येने सामूहिक गायनाचे कार्यक्रम होत असून त्‍याच अनुषंगाने गीता पठण कार्यक्रमानंतर ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर जमलेल्‍या हजारो विद्यार्थ्‍यांनी एकाचवेळी एक सुरात ‘वंदेमातरम्’चा जागर केला.
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement