Published On : Thu, May 17th, 2018

कार्यकर्त्यांनी दररोज 3 तास प्रचाराला द्यावे : पालकमंत्री


नागपूर/भंडारा: कार्यकर्त्यांनी दररोज सायंकाळी 3 तास देऊन मतदारांशी संपर्क करावा व ही निवडणूक का आणि कशी लादली गेली हे मतदारांना सांगावे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

बुधवारी संपूर्ण दिवसभर पालकमंत्री बावनकुळे यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातील मुरमाडी, पोहरा, दिघोरी, लाखांदूर, पालांदूर येथे कार्यकर्त्यांच्या सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सर्व ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते आणि बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व बैठकींना आ. बाळा काशीवार, शिवराम टेंभुर्णे, पद्माकर बावनकर, श्यामबाबू खेडीकर, म. वा. घोडमे, गभने, शिवराम गिरेपुंजे, उत्तम कांबळे, गीताताई कापसे, श्रीमती नेताम आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण ज्या पध्दतीने लढवितो, तसा प्रचार करण्याच्या सूचना देताना बावनकुळे म्हणाले- जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. पालकमंत्री म्हणून मला अजून दीड वर्ष काम करायचे आहे. या काळात मी रस्ता, वीज, पाणी या मुलभूत सुविधा जिल्ह्यातील गावांपर्यंत पोहोचवणार आहे. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काय नियोजन केले याची माहिती पालकमंत्री व आ. काशीवार यांनी जाणून घेतली. तसेच कार्यकर्त्यांना आपल्या अडचणी मांडण्याची संधी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी जनतेसाठी आणलेल्या योजना जनतेला सांगा. हेमंत पटले यांच्या बाजूने पक्षाने अनेक नेते उभे आहेत, याउलट विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने कोण उभे आहे, यााकडे लक्ष द्या. हेमंत पटले यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहनही पालकमंत्री बावनकुळे यांनी व आ. काशीवार यांनी केले.