Published On : Thu, May 17th, 2018

भारनियमन शब्द गावात ठेवणार नाही : पालकमंत्री बावनकुळे

moharna jahir sabha Bawankule

नागपूर/भंडारा: मागील साडे तीन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हे राज्य भारनियमनमुक्त केले आहे. आता भारनियमन हा शब्द गावातही ऐकू येणार नाही. तसेच शेतकर्‍यांना दिवसा वीज देणार असल्याचे आश्‍वासन राज्याचे ऊर्जामंत्री व भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. साकोली विधानसभा क्षेत्रातील मोहरना व पिंपळगाव येथे झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. या दोन्ही जाहीरसभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

याप्रसंगी आ. बाळा काशीवार, उत्तम कांबळे, पं.स. सभापती दादाजी राऊत, रघुजी मेंढे, विकास हटवार, नरेश खरकाटे व अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- पालकमंत्री पांदन योजना आता आली आहे. शासनाने मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या सर्व योजना मागासवर्गीयांमधील शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहाचवल्याशिवाय राहणार नाही. अजून माझ्या हातात दीड वर्षाचा कालावधी आहे. भंडाराची जिल्हा नियोजन समिती 85 कोटींवरून आपण 145 कोटींपर्यंत नेली आहे. हा सर्व निधी लोकांच्या विकासासाठी अनेक योजनांमधून वापरला जाईल.

आतापर्यंत आपल्या माजी खासदाराने किती योजना आणल्या, याचा विचार आपण केला पाहिजे. मोहरना आणि पिंपळगाव या भागात साधे रस्तेही माजी खासदार करू शकला नाही. दरवर्षी मिळणारे 5 कोटी याप्रमाणे साडे तीन वर्षातील साडे सतरा कोटी कुठे आहेत, याचा जाब मतदारांनी विचारून मतदानातून धडा शिकवला पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी आ. बाळा काशीवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपण या मतदारसंघासाठी केलेल्या कामाचा आढावा आपल्या भाषणातून केला.