नागपूर – आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाचा आलेख वाढला तो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे. आमदार, खासदार, मंत्री माजी होतात, पण कार्यकर्ता कधीही माजी होत नाही. पक्षाचे उद्दिष्ट हेच कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट्य आहे. कार्यकर्ता हीच सर्वांत मोठी ताकद आहे. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर देशाला जागतिक महाशक्ती म्हणून गौरव प्राप्त करून द्यायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
दक्षिण-पश्चिम नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन बीआरए मुंडले शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष रितेश गावंडे, सर्वश्री राजीव हडप, अविनाश ठाकरे, संदीप जोशी, रमेश घिरडे, रमेश सिंगारे, दिलीप दिवे, किशोर वानखेडे, प्रकाश भोयर, मुन्ना यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला योगदान द्यायचे आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘अनेक कार्यकर्त्यांनी आयुष्य वेचले पक्षासाठी. ते कधीही मोठ्या पदावर पोहोचले नाही. त्यांना काहीच मिळाले नाही. पण तरीही प्रत्येकवेळी निवडणुकीत पूर्ण शक्तीने काम करतात.’
आपल्याला जनतेचे समर्थन आहे. जात-पात धर्म न पाळता प्रत्येकाचे काम केले. कोरोनामधील परिस्थिती हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. हीच आपल्या पक्षाची संस्कृती आहे. मानवतेच्या आधारावर समाजनिर्मितीचे काम भाषणातून नव्हे तर व्यक्तीगत कृतीमधून होणार आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. आपला इतिहास, संस्कृती, परंपरा आणि त्याला जोडून आर्थिक विकास या जोरावर आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे.
आपल्याला जात-पंथ-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज उभा करायचा आहे. आर्थिक, सामाजिक समरसता असलेला समाज निर्माण करायचा आहे. त्या उद्दिष्ट्यांकरिता आपण सारे काम करतो. म्हणूनच आपण पार्टी विथ डिफरन्स आहोत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.