Published On : Thu, Sep 26th, 2019

खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करा!

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : कार्य प्रगतीची केली आकस्मिक पाहणी

नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करा. दोन पाळीत काम करा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय मनपा आयुक्तांनी गांभीर्याने घेतला असून यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत खड्ड्यांना बुजविण्यासंदर्भात कडक निर्देश दिले आहेत. प्रारंभी कार्यकारी अभियंत्यांच्या आणि नंतर प्रत्येक झोनमधील अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांसोबत बैठक घेऊन विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. मंगळवारी (ता. २४) घेतलेल्या बैठकीत त्यांनी सात दिवसांत संपूर्ण नागपूर शहरातील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने गुरुवारी (ता. २६) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागपूर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता आर.जी. खोत, डी.डी. मेंडुलकर, चंद्रकांत गभने उपस्थित होते.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रारंभी लोहापूल आणि त्यानंतर कॉटन मार्केट येथील मेट्रोच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. मेट्रोच्या कामामुळे पडलेले खड्डे नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बुजवावे, असे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यालगत असलेले पाणी काढून आवश्यक तेथे पाईपलाईन टाकण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यानंतर आयुक्त अभिजीत बांगर हे अजनी चौकात पोहोचले. अजनी चौकातून खामला चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्याचे कार्य सुरू होते. या कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. प्रत्येक झोनमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील कामाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. खड्डे बुजविण्याचे कार्य दिवसरात्र सुरू ठेवा. दोन पाळीमध्ये कार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपाच्या हॉटमिक्स प्लान्टवर जर अधिक भार येत असेल तर नागपूर सुधार प्रन्यासच्या हॉटमिक्स प्लान्टची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

खड्डे बुजविताना वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी अन्य रस्त्यांवरून वाहतूक वळवावी, यासाठी ते स्वत: पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांच्याशी बोलले. वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून वाहतुकीत अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.