Published On : Thu, Aug 10th, 2017

बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी जानेवारीत महिला उद्योजकता मेळावा

नागपूर: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या महिला उद्योजकता मेळाव्याचे आयोजन यंदाही नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. मेळाव्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, समितीच्या सदस्य नगरसेविका साक्षी राऊत, वैशाली नारनवरे, वंदना भगत उपस्थित होत्या. महिला उद्योजकता मेळावा आयोजनाच्या दृष्टीने आयोजित सदर बैठकीत मेळावा आयोजनावर विस्तृत चर्चा झाली. महिला बचत गट सदस्यांच्या सोयीने लवकरच मेळाव्याची तारीख ठरविण्यात येईल. तयारीच्या दृष्टीने विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी लवकरच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.

यावेळी बोलताना श्रीमती ठाकरे म्हणाल्या, माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या महिला उद्योजकता मेळाव्याची आज स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. यंदाचा मेळावा हा सर्वच दृष्टीने अविस्मरणीय ठरेल यादृष्टीने त्याचे नियोजन करण्यात येईल. समितीचे सर्वच सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उपसभापती श्रद्धा पाठक यांनी मेळाव्याचे नियोजन हे बचत गटातील महिलांना लाभदायक ठरेल, अशाच दृष्टीने करण्याची सूचना केली. समितीचे सर्व सदस्य यासाठी स्वत: नियोजनात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.


सदर बैठकीतच स्वयं सहायता महिला बचत गटांना महानगरपालिकेचे उद्यान प्रायोगिक तत्वावर करार करून जैविक खत तयार करण्याकरिता वापरण्यास देण्यासंदर्भात चर्चा झाली. यासाठी आठ ते दहा बचत गटांचे अर्ज आले असून ज्या प्रभागातील हे बचत गट असतील त्या प्रभागातील उद्याने त्यांना करार पद्धतीवर देण्यास समितीने एकमताने मंजुरी दिली.

बैठकीला मनपाच्या समाजकल्याण विभागाचे चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे, शारदा भुसारी, कोमल तुमडाम, उज्ज्वला पहाडे उपस्थित होते.
झोननिहाय उद्योजकता मेळावा महिला उद्योजकता मेळाव्यात शेकडो बचत गट सहभागी होतात. अनेक बचत गटांना यात संधी मिळत नाही. त्यामुळे यावर्षीपासून छोट्या स्तरावर झोननिहाय महिला उद्योजकता मेळावे घेण्याची सूचना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी केली.

दिवाळीपूर्वी हे मेळावे घेण्यात यावे. यासंदर्भात लवकरच संबंधित झोनचे सभापती आणि सहायक आयुक्तांची बैठक घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.