Published On : Tue, May 8th, 2018

महिला आयोगाची सायबर समिती! आज होणार पहिली बैठक

मुंबई: सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

या सायबर समितीच्या माध्यमातून महिलांना लक्ष्य करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास केला जाईल व अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने राज्य सरकारला शिफारशी करण्यात येतील.

सोशल मीडियावर महिलांची बदनामी करणे, त्यांना त्रास देणे, मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये व टिप्पणी करण्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही काळात वाढत आहे. त्यामुळे समिती स्थापून सरकारला शिफारसी करून, असे प्रकार रोखण्याची गरज होती, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

समितीच्या अध्यक्षस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह असतील. सदस्य म्हणून महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीचा अभ्यास असलेले वकील अ‍ॅड. प्रशांत माळी, अ‍ॅड. वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार व लेखिका मुक्ता चैतन्य यांचाही समावेश आहे. कालांतराने समितीत आणखी काही पोलीस अधिकारी, तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल.

अभ्यासपूर्ण अहवाल तयार करणार
समितीच्या बैठका नियमितपणे घेऊन समितीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून, तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले.