Published On : Tue, Oct 16th, 2018

नागपुरात आता महिलांचे ‘बँड पथक’

Advertisement

मनपा महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार : महिला बचत गटांच्या सदस्यांचा राहणार समावेश

नागपूर : हौसी तरुण-तरुणी छंदाचा भाग म्हणून तयार करीत असलेले बँड पथक नागपुरात चांगलेच ख्यातीप्राप्त होत आहेत. याच धर्तीवर नागपुरात आता चक्क संसार करणाऱ्या महिलांचे आगळेवेगळे ‘बँड पथक’ तयार होणार आहे. ही आगळीवेगळी संकल्पना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी मांडली असून लवकर ती प्रत्यक्षात उतरणार आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक मंगळवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सदर बैठकीत या संकल्पनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, सदस्या दिव्या धुरडे, सरीता कावरे, मनिषा अतकरे, रश्मी धुर्वे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय अधिकारी (मे.) डॉ. विजय जोशी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

सदर बैठकीत महिला बचत गटाच्या सदस्यांना विविध कला आणि उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बचत गटांच्या महिलांना नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांचे बँड पथक तयार करण्याची संकल्पना सभापती प्रगती पाटील यांनी मांडली. या संकल्पनेला सर्वच सदस्यांनी प्रतिसाद देत त्यावर चर्चा केली. विविध बचत गटातील २० महिलांची यासाठी निवड करण्यात येणार असून पुढील काही दिवसांत त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. महिलांच्या या बँड पथकाला भविष्यात व्यावसायिक स्वरूप देऊन त्यातून त्यांना मिळकत करून देण्याचा मानस असल्याचे सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले.

बँड पथक तयार करण्यासोबतच महिला बचत गटासाठी संगीत प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छ असोशिएशनमार्फत त्यांच्या रामनगर येथील कार्यालयात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बचत गटातील महिलांकरिता कचरा संकलन केंद्र सुरू करण्यासंदर्भातही बैठकीत निर्णय घेण्यात आला. बांबूपासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही महिला बचत गटातील महिलांना देण्यात येणार असून या सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत महिलांची निवड करण्याचे आणि त्याची यादी महिला व बालकल्याण समितीकडे सोपविण्याचे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी दिले.

सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
महिला व बालकल्याण समितीच्या वतीने नागपूर शहरात कार्य करणाऱ्या सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर झोननिहाय आयोजित करण्यात येणार असून मनपाचा आरोग्य विभाग यासाठी सहकार्य करणार आहे. या शिबिराचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली.

डिसेंबरमध्ये ‘महिला उद्योजिका मेळावा’
महिला व बालकल्याण समितीतर्फे बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने दरवर्षी ‘महिला उद्योजिका मेळाव्या’चे आयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा हा मेळावा २ डिसेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली. मेळाव्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या तयारीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

Advertisement
Advertisement