Published On : Tue, Oct 16th, 2018

दिवाळीनंतर त्वरित भंगार बस लिलाव प्रक्रिया पूर्ण करा !

Advertisement

प्रवीण भिसीकर यांचे निर्देश : भंगार बसेस लिलाव संदर्भात बैठक

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून हद्दपार झालेल्या भंगार बसेसच्या लिलावासंदर्भात येत असलेले अडथळे लवकरात लवकर दूर करून दिवाळीनंतर त्वरित या बसेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश भंगार बसेस लिलाव संदर्भात गठीत उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी (ता. १६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात व्‍ही.एन.आय.एल.च्या भंगार बसेस लिलावात काढण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये उपसमितीचे सदस्य नितीन साठवणे, सदस्या अर्चना पाठक, परिवहन व्‍यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, उपसमितीचे सल्लागार प्रकाश जोशी, प्रभारी यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखाधिकारी विनय भारद्वाज उपस्थित होते.

भंगार बसेसच्या लिलाव प्रक्रियेसंदर्भात आतापर्यंत देण्यात आलेल्या निर्देशांचाही उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी यावेळी आढावा घेतला. हिंगणा व टेका नाका येथे मनपाच्या भंगार बसेस आहेत. या दोन्ही ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. भंगार बसेसच्या सभोवताल वाढलेले गवतही साफ करण्यात आले असून लवकरात लवकर ऑनलाईन लिलावापूर्वी दोन्ही ठिकाणी गाड्यांचे लॉट तयार करण्यात यावेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांना प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी व त्यासाठी लवकर बैठक बोलाविण्यात यावी, असेही उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी निर्देशित केले.

येत्या १५ ते २० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण ऑनलॉईन लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास आहे. हिंगणा येथील भंगार बसेसच्या ठिकाणाचा ‘ले-आउट’ तयार करण्यात आला असून त्याचे ‘लॉट‘ही लवकरच तयार करण्यात येतील; मात्र टेका नाका येथील गाड्या अस्ताव्यस्त असल्याने त्याचे ‘लॉट’ तयार करण्यात अडचण निर्माण होत असल्याचे उपसमितीचे सल्लागार प्रकाश जोशी यांनी यावेळी सांगितले. टेका नाका येथील अस्ताव्यस्त अवस्थेतील गाड्या हटवून त्या सुरळीत लावण्यात याव्यात व ही जागा येत्या दोन दिवसात ‘लॉट‘ पाडण्यायोग्य करण्यात यावी, असे निर्देशही अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले.

२२८ बसेसची नोंदणी लवरात लवकर रद्द करा
भंगार बसेस लिलावात काढण्याआधी त्यांची परिवहन नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. मनपाच्या २२८ पैकी १६२ गाड्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत संपूर्ण २२८ बसेसची नोंदणी रद्द होणार नाही, तोपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू करता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करा, असेही श्री. भिसीकर यांनी निर्देशित केले. लिलाव प्रक्रियेची संपूर्ण माहिती परिवहन समिती सभापती बंटी कुकडे व आयुक्त रवींद्र ठाकरे देण्यात यावी. तसेच ज्या-ज्या नियमानुसार प्रशासकीय मान्यता घ्यायची आहे त्या सर्व मान्यताही महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात याव्यात. लिलाव प्रक्रीया संदर्भात उद्‌भवणाऱ्या अडचणी समितीला लगेच सांगून लिलाव प्रक्रियेमधील अटी व शर्तींमध्ये समितीकडून सुचविण्यात येणाऱ्या सुधारणा करून पारदर्शकरित्या ही प्रक्रिया पूर्ण केली जावी, असेही उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी यावेळी निर्देश दिले.

Advertisement
Advertisement