Published On : Thu, Jan 10th, 2019

‘दामिनीं’च्या उपस्थितीने महिला उद्योजिकांना मिळाली ऊर्जा

Advertisement

महिला उद्योजिका मेळावा : हास्य कवी संमेलनाने केले लोटपोट

नागपूर : नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी उद्घाटन कार्यक्रमात पोलिसांच्या दामिनी पथकाची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांच्या उपस्थितीने उद्योजिका म्हणून मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना नवी ऊर्जा मिळाली. सर्व उद्योजिकांच्या वतीने दामिनी पथकातील सर्व महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

पाचव्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मनिषा कोठे, सुमेधा देशपांडे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई, श्री. हेहाऊ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर म्हणाल्या, महिला उद्योजिका मेळावा महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणारा आहे. या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली आणि आत्मनिर्भर झाली. नागपूर महानगरपालिकेने मेळाव्याच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले याचा अभिमान आहे. पोलिसांचे दामिनी पथक महिलांना मदत देण्यासाठी २४ तास तत्पर असते. दामिनी पथकातील महिला पोलिस घरची जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडतात. या महिला पोलिसांचा सत्कार करून त्यांच्याही कार्याला प्रोत्साहित केले. याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तत्पुर्वी मशाल प्रज्वलित करून महिला सुरक्षेचा संदेश ‘बलून’च्या माध्यमातून आकाशात सोडला. महिला व बालकल्याण समितीच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. संचालन रेखा दंडीगे-गिवे यांनी केले तर आभार संगीता खोब्रागडे यांनी मानले.

उद्योजिकांचा सत्कार
पाचव्या दिवशी महिला उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये ज्ञानवर्धिनी पुरस्कार प्राप्त डॉ. रमा मसराम, मंजिरी टेक्सटाईलच्या मंजिरी आरडे, राज्य परिवहन मंडळात कार्यरत आणि भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सचिव नीता चौबे, शिक्षिका असूनही कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, कापडी बॅगची निर्मिती करणाऱ्या दीपाली बापट, ग्रामीण महिला पतसंस्थेच्या संचालिका रश्मी पोफळी यांचा समावेश होता.

‘दामिनीं’चे स्वागत
कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेल्या दामिनी पथकाच्या महिला पोलिस तृप्ती सहारे, करिष्मा बांते, सोनाली राऊत, मिथिला धवड, तृप्ती देशमुख, कविता पाटील, सीमा टेकाम, ज्वाला मेश्राम, भारती माडे, पूजा लोंढे, गीता शेख, रेखा हरिणखेडे यांचे उपस्थित सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.

हास्य कवी संमेलनाने आणली रंगत
मनोरंजन कार्यक्रमाच्या मालिकेत गुरूवारी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी सुनील सावरा (मुंबई), किरण जोशी (अमरावती), कपिल जैन (यवतमाळ), अनिल मालोकर (नागपूर), सरिता सरोज (गोंदिया) यांनी हास्य, वीर, श्रृंगार रसातील कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. कवी संमेलनाचे संचालन किरण जोशी यांनी केले. त्यांनीही आपल्या अनोख्या शैलीतून आणि कवितांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

शुक्रवारी (ता. ११) दुपारी २ वाजता महिलांकरिता पतंग स्पर्धा आणि सायंकाळी ५.३० वाजता प्रख्यात रॉक स्टार पल्लवी दाभोळकर यांचा संगीत कार्यक्रम होईल. तत्पुर्वी सायंकाळी ५ वाजता एसिएटीक बिग कॅट सोसायटी यांच्या वतीने वनराई फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईट यांच्या सहयोगाने वन्यजीवावर आधारित ‘मछली-द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर’ आणि ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ या दोन शॉर्ट फिल्मचे विशेष स्क्रिनींग आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शित सुब्बया नाल्ला मुत्थू यांचा सत्कार येईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू उपस्थित राहतील. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी अध्यक्षस्थानी राहतील. रोटरीचे किशोर केडिया, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, क्रिकेटर प्रशांत वैद्य, सुब्रतो बॅनर्जी उपस्थित राहतील.