Published On : Mon, May 29th, 2017

महिलांनो, घाबरून न जाता परिस्थितीचा सामना करा : महापौर

Advertisement


नागपूर :
ज्या महिलांना कर्करोगाचे निदान झाले त्या पीडित महिलांनी घाबरून न जाता परिस्थितीचा सामना करावा, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केले.

पं. दीनद्याल उपाध्याय इंस्टिट्युट ऑफ सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१ व्या वाढदिवासानिमित्त नागपूर शहरात महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणीची ६१ शिबिरे घेण्यात आली. ६१ व्या शिबिराच्या समापनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अभियानाच्या संयोजिका मनिषा काशीकर उपस्थित होत्या.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, स्तन कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये सद्यस्थितीत भरपूर प्रमाणात आढळून येत असल्याने महिला घाबरतात. अशावेळी महिलांनी घाबरून न जाता परिस्थीतीचा सामना करावा. या अभियानाचा हा स्तुत्य उपक्रम असून त्याद्वारे तीन लाख महिलांची आपण कशी तपासणी करू याचा विचार आपल्याला करायला हवा. ज्या महिलांमधे कर्करोगाचॆ निदान झाले त्या सर्व महिलांनी काळजी घेऊऩ त्यावर त्वरित उपचार करावा. ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या सर्व गोष्टींची पूर्तता मी करीन, असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर यांनी या अभियानाचे कौतुक करत भविष्यात ज्या-ज्य़ा गोष्टींची आवश्यकता लागेल त्या सर्व गोष्टींची पूर्तता करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा काशीकर यांनी केले. संचालन वैशाली सोनुने यांनी केले. आभार संध्या अढाळे यांनी मानले.

याप्रसंगी नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, सोनाली कडू, वनिता दांडेकर, अनिता काशीकर त्याचप्रमाणे समितीचे पदाधिकारी उपस्थित होत्या.