Published On : Fri, Mar 8th, 2019

महिला दिनी निमित्याने मेट्रोत महिला शक्तीचा जागर

Advertisement

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विडिओ लिंकद्वारे दिल्ली येथून दिनांक ०७ मार्च रोजी नागपूर मेट्रोचे थाटात उदघाटन झाले असून आज शुक्रवार दिनांक ०८ मार्च रोजी महा मेट्रोतर्फे आभार दिवस साजरा करण्यात आला.तसेच महिला दिवसांचे औचित्य साधुन महा मेट्रो द्वारे आज विशेष मेट्रो राईड चे आयोजन देखील करण्यात आले होते. सदर राईड मध्ये नागपूर शहराच्या महापौर श्रीमती. नंदा जिचकार या देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या. श्रीमती ज्योती दीक्षित यांनी नंदा जिचकार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. महा मेट्रो द्वारे आयोजित करण्यात आलेल्या मेट्रो राईड मध्ये महिला करिता विशेष ३ मेट्रो राईड चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग नोंदविला तसेच प्रत्येक महिलांना फुल देऊन प्लॅटफॉर्म वर त्यांचे स्वागत करण्यात आले.

शहरात महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या कार्याला सुरवात झाल्यापासून नागपूरकरांनी नेहमीच महा मेट्रोच्या कार्यात सहकार्य केले आहे. नागपूरकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी महा मेट्रोने संपूर्ण दिवसभर मेट्रोची मोफत प्रवासी सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत महिलांनी सिताबर्डी ते खापरी आणि खापरी ते सिताबर्डी पर्यंत मेट्रो राईड चा आनंद घेतला.

विशेष म्हणजे महिला दिनानिमित्य आयोजित मेट्रो राईड करिता मेट्रो ने आपल्या महिला कर्मचाऱ्याना तैनात केले होते, ज्यामध्ये महिला लोको पायलट,ट्रेन अटेंडंट,स्टेशन कंट्रोलर,सुरक्षा रक्षक इत्यादी तैनात होते. महापौर यांनी महा मेट्रोला शुभेच्छा देत,महा मेट्रो द्वारे महिला दिनानिमित्य घेण्यात आलेल्या मेट्रो राईडचे कौतूक करीत महिलांना महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक(प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक श्री. सुनील माथुर, महाव्यवस्थापक(प्रशासन) श्री. अनिल कोकाटे,श्री.उराडे तसेच इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महिला पोलिसांनी लुटला मेट्रो राईडचा आनंद

सदैव वाहतूकीच्या ठिकाणी तैनात असलेल्या महिला ट्राफिक पोलिसांन करता महिला दिवसांच्या निमित्याने विशेष मेट्रो राईड चे आयोजन करण्यात आले होते. महा मेट्रोच्या वतीने प्रत्येक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे फुल आणि चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, डीसीपी(ट्राफिक) श्री. राजमाने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भांडारकर, महा मेट्रोचे महाव्यवस्थापक(प्रशासन) श्री. अनिल कोकाटे,श्री.संजय पांडे,अरविंद गिरी प्रामुख्याने उपस्थित होते.