नागपूर : नागपूर विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विहिरीबाहेर आढळलेल्या चप्पल आणि बॅगेमुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की अन्य काही प्रकार, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात २०१४ मधील सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याची पावती आढळली. या पावतीवर ‘वंदना सुनील पाटील’ असे नाव असून, इंदुरा येथील हरडे ज्वेलर्सचा उल्लेख आहे.
या पावतीच्या आधारे पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पावतीवरील नाव मृत महिलेचेच आहे, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासातून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




