नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज सकाळी लाच घेणाऱ्या एका महिला मोटर वाहन निरीक्षकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जामकांद्री हद्दीत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. ही कारवाई नागपूरची नसून अमरावती एसीबीने केल्याची माहिती एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना दिली.
गीता शेजवार असे लाच मागणाऱ्या महिला आरटीओ निरीक्षकाचे नाव असून, तिने कोणतीतरी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी एका व्यक्तीकडून लाखोंची लाच मागितली होती. तक्रारदाराने घटनेची माहिती तात्काळ अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांना दिली, त्यांनी चौकशीचे आदेश दिले. महिलेला अद्यापही अटक झाली नसून ती फरार असल्याची माहिती आहे. तपास कारण्याअगोदर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपांची पुष्टी केली .
या घटनेमुळे आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून याची चर्चा रंगली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घटनेचा तपास सुरु असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेने सरकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.