
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी शुभम प्रफुल जैस्वाल याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी, शिवीगाळ यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २००८ मध्ये झाला होता. मात्र, २०२२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर ती मुलीसह आईच्या घरी राहत होती. याच काळात फेसबुकच्या माध्यमातून तिची शुभम जैस्वाल याच्याशी ओळख झाली.
आरोपानुसार, शुभमने महिलेला लग्नाचे आश्वासन देत धरमपेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये तसेच इतर ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला. तसेच फोनवरून धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि पैशांची मागणी केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी सीताबर्डी परिसरातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




